Tuesday, April 17, 2012

माझी सोनोग्राफी

माझी सोनोग्राफी

शीर्षक वाचून 'पुरुषांची सोनोग्राफी!' असं म्हणत गालातल्या गालात हसू नका. सोनोग्राफी पुरुषांची पण करतात (अर्थातच कारणं बायकांच्यापेक्षा वेगळी असतात)! असो. तर त्याचं असं झालं की एक दिवस कंपनीला अचानक आम्हा सर्व एम्प्लॉईजच्या तब्येतीची काळजी करावीशी वाटली आणि आमच्या एच. आर. नं शांतपणे सगळ्यांना जे. एम. रोड वरच्या एका क्लिनिक मधून खम्प्लेट हेल्थ चेकप करून घ्यायचं फर्मान सोडलं. आता या चेकपचे पैसे कंपनी देणार म्हटल्यावर अख्खी कंपनी त्या क्लिनिकच्या दारात उभी!!! (फुकट दिलं तर आमचे लोक विष पण पितील...) असो तर एवढी गर्दी बघून तो डॉक्टर घाबरला. त्याला वाटलं चुकीच्या औषधांमुळे कुठलातरी पेशंट खपला आणि त्याचे नातेवाईक मोर्चा घेऊन आले मारायला. xxx ला पाय लावून तो धुम्म पळत सुटला आणि त्याच्यामागे - नर्सेस आणि वॉर्डबॉईज... असो. तर त्या दिवशी त्या हेल्थ चेकपचे बारा वाजले. अख्खी कंपनी बोंबा मारत परत फिरली. जोशी वडेवाले आणि गुडलक कॅफे, दोघांचाही धंदा मजबूत चालला आणि दुसरे दिवशी एच. आर. नं रविवार सकाळ खराब केल्याबद्दल नको नको त्या शिव्या खाल्ल्या. हे एच आर वाले लोक पण ना स्थितप्रज्ञ वगेरे म्हणतात तसे आहेत बुवा. कितीही शिव्या घाला हे ढिम्मच! पण एक आहे त्या लोकांनी अगदीच हात वर केले नाहीत. शांतपणे सगळ्या लोकांना हेल्थ चेकपसाठी दिवस आणि वेळ ठरवून दिली आणि मी पुढच्या रविवारी त्या क्लिनिकपाशी जाऊन ठाकलो.

काउंटरपाशी एक फॉर्म भरल्यावर एक माणूस मला 'पॅथॉलॉजी' असं गोंडस नाव दिलेल्या खोलीत घेऊन गेला. "ब्लडटेस्टसाठी रक्त घेतो." असं म्हणून त्या गाढवाने एक लांबलचक सुई हातात घुसवली आणि एक दोन थेंब सोडून चक्क टेस्ट ट्यूब भरून रक्त काढून घेतलं. "अहो...आमच्या घरी शुगर चेक करायचं मशीन आहे. त्यात एक थेंब पुरतो. तुम्ही एवढं रक्त का घेतलं हो?" मी चक्क निषेधाच्या सुरात बोललो. "अरे हे मर्द मराठ्याचं रक्त आहे.. एकेका थेंबामागे रक्ताचे पाट वाहतील", वगेरे 'ठाकरे' ईश्टाईल भाषा माझ्या डोक्यात घोळायला लागली होती. पण तो गाढव स्वस्थ होता. 'कॉम्प्रेहेन्शीव चेकिंग हाये ना तुमचं, मंग हेवडं रग्द लागतंय त्येला" असं म्हणून त्याने शांतपणे माझ्या हातावर स्पिरिटचा बोळा फिरवला. आता मला स्पिरिटच्या वासानं चक्कर येते. पण त्या गाढवाला ते 'मर्द मराठ्याचं रक्त' दिल्यावर तिथे भोवळ येऊन पडणं म्हणजे इज्जतचा स्ट्रेट फालुदा होता. त्यामुळे मी त्याला कळणार नाही अशा बेताने हळू हळू भिंतीचा आधार घेत बाहेर येऊन खुर्चीत बसलो. आता गप बसेल का नाही... पण नाही... ,"चक्कर वगेरे येत आसल तर सांगा. पडू बीडू नगा हीदं", असं तो गाढव अख्ख्या पुण्याला ऐकू जाईल अशा बेताने खणखणित आवाजात म्हणाला. मी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं आणि समोर पडलेल्या पेपर मधल्या बातम्या वाचायचं सोंग घेतलं.

पुण्याची छान थंडीतली सकाळ ती... बसल्या बसल्या हळू हळू मी पेंगायच्या मार्गावर होतो तेवढ्यात एक नर्स माझ्यासमोर येऊन उभी राहिली. माझ्या हातातला फॉर्म शांतपणे हातात घेतला आणि म्हणाली, "माझ्यामागून या." तशी मुलींच्या मागून जायची सवय असल्यामुळे अर्धवट झोपेत असूनही मला तिच्यामागून जाणं फारसं अवघड गेलं नाही. ती मला एका छोट्याश्या रूममध्ये घेऊन गेली. दरवाजा बंद केला आणि म्हणाली," हं आता इथे आडवे व्हा आणि शर्ट काढा." माझी झोप तडकाफडकी पळाली!!! तिथल्या त्या गुलाबी थंडीतही मला चक्क घाम फुटला. हसू नका. असा प्रसंग तुमच्यावर ओढवला ना म्हणजे कळेल. एक बाई ( ती पण म्हशीसारखी काळीढुस्स!!!) सकाळी सकाळी एका छोट्याश्या रूममध्ये कपडे काढायला सांगते म्हणजे काय... "अहो सिस्टर पण ते....", मी 'सिस्टर' या शब्दावर भर देत काहीतरी बोलायचा किंवा खरं सांगायचं तर निषेधाचा माफक सूर काढायचा प्रयत्न केला. "अहो जरा लवकर... लोकं खोळंबलीयेत. सी जी झाला की एक्स-रेला पण जायचंय तुम्हाला...” असं म्हणत ती त्या सी जी यंत्राशी खेळायला लागली. अच्छा म्हणजे तुम्ही सी जी साठी म्हणत होता होय... मला काहीतरी भलतंच वाटलेलं’, असं मी अर्थातच मनातल्या मनात म्हणालो आणि शांतपणे शर्ट काढला.... सी जी च्या नंतर एक्स-रे काढून त्या 'सिस्टर' नं मला 'सोनोग्राफी' च्या रांगेत उभं केलं...आता माझा नंबर कधी लागणार म्हणून मी विचार करतोय तोपर्यंत त्या गाढवीनं अख्ख्या महाराष्ट्राला ऐकू जाईल अशा आवाजात विचारलं, "युरीन कधी पास झालीये?". (तरी नशीब "शू करून किती वेळ झाला" असं नाही बोलली. मंद कुठची... अरे चार चौघात तरुण मुलांना काय आणि कसं विचारावं याचं काही भान... ) मी शांतपणे तिच्याकडे दुर्लक्ष करत तो मी नव्हेच’ अशा अविर्भावात रांगेतल्या माझ्या पुढच्या माणसांकडे बघायचं नाटक केलं. तिला ते लक्षात आलं असावं कारण मग शांतपणे "सोनोग्राफीसाठी ब्लॅडर फुल पाहिजे. रांगेत उभं राहून पाणी पीत रहा", असं म्हणत ती आणखी एका पेशंटला उघडा करायला निघून गेली.

सोनोग्राफीच्या त्या रांगेत माझ्या आधीच माणसं उभी होती. एक अवघडलेली बाई (प्रेग्नंट बाईला सभ्य भाषेत 'अवघडलेली बाई' असं म्हणतात आणि पेपरमधल्या भाषेत 'गरोदर' असं म्हणतात.),एक नुकतं लग्न झालेली तरुणी (डोम्बल तरुणी... घोडनवरी होती चाळीशीची !), एक साधारण ६० चे काका / आजोबा टाईप्स, आणि त्यांची बायको . मी आपला पाणी पीत उभा झालो आणि माझ्यामागे ७५ वर्षांची एक जख्खड खेडवळ म्हातारी येऊन थांबली.आता मी पाणी पीत सुटलो होतो आणि ब्लॅडर भरायला लागल्याची जाणीव हळू हळू होत होती. तेवढ्यात "तुम्ही आजकालची तरनी पोरं म्हंजे कठीनच.. ७५ वर्षांची हाये मी पन आजपरेंत दवाखान्याची पायरी न्हायी चढले मी. आता वय झालं आनी डॉक्टर बोल्ला म्हनून आले हिदं...तू येवडा तरना आनी दवाखान्यात... नाजूकच हायेस कि रे... काय झालं तुला?" असं म्हणून त्या आज्जींनी माझ्यावर एकदम धाडकन हल्ला केला. खरं तर मी तिच्याकडे शांतपणे दुर्लक्ष केलं असतं पण माझ्या पुढे रांगेत उभे असलेले ६० वाले काका काकू मागे वळून माझ्याकडे बघायला लागले. आत्ता त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांच्या माझ्याकडे बघायच्या नजरेवरून त्यांना एक उपवर मुलगी (सभ्य मराठीत 'लग्नायोग्य' मुलींना 'उपवर' म्हणतात) असावी असं लक्षात आलं. आता मी एक 'उपवधू' मुलगा आहे म्हटल्यावर मी निरोगी आहे आणि इथे फक्त माझ्या कंपनीच्या साठी म्हणून फक्त चेकप साठी आलोय हे सांगणं आवश्यक होतं. त्याशिवाय त्या म्हातारीशी बोलताना 'वयोवृद्धांचा मान' वगेरे गुण पण दाखवता आले असते. त्यामुळे मी त्या म्हातारीशी एकदम प्रेमाने बोलायला सुरुवात केली, "अहो आज्जी काही झालेलं नाहीये मला. माझ्या कंपनी मध्ये माझ्या बॉसनं मला शरीराची संपूर्ण तपासणी करायला सांगितलीये म्हणून इथं आलोय. छान ठणठणीत आहे मी...” आईशप्पथ... हेल्थ चेकपचं शरीराची संपूर्ण तपासणीअसं मराठीकरण करताना मलाच हसू आलं पण त्यामुळे माझं माय-मराठीचं ज्ञान आणि माझ्याबद्दल माझ्या कंपनीला वाटणारी सहानुभूती हे आज्जी आणि ते काका काकू यांच्यापर्यंत पोचलं म्हणून मी खुश झालो.

त्या आज्जींच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. त्यांची तरुणपणीची तब्येत आणि मग सुनेने केलेले हाल त्यामुळे बिघडलेली आर्थिक आणि शारीरिक परिस्थिती यावर त्यांचं पुराण चालू झालं. आता रोज संध्याकाळी झी आणि टीव्ही मराठीवर ५० वेळा माना हलवत आणि कॅमेरा झूम ईन - झूम आउट करत "थांब... एक पाउल पुढे टाकशील तर याद राख. या घराण्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे" वगेरे डायलॉग बघितल्यावर त्या ज्जींची स्टोरी मला फारच चंपक वाटत होती. त्यांच्या सुनेनं त्यांना कधी ढकलून पाडलं नाही कि कधी विजेचा शॉक दिला नाही आणि विष वगेरे तर एकदाही दिलं नाही. फक्त ती एक-दोनदा त्या आज्जींच्या चुलत मामेबहीणीच्या पाया पडली नाही म्हणून तिच्यावर संस्कारच नाहीत वगैरे वगैरे तक्रारी आज्जी करत होत्या. आता त्यांना गप्प करणं आवश्यक होतं. रांगेत माझ्या पुढे उभे असलेले काका काकू (म्हणजे बेसिकली त्यांची 'उपवर' मुलगी) हे माझे टारगेट होते. मला नोकरी आहे, कंपनी चेकपचा खर्च करते म्हणजे कंपनी चांगली आहे, माझं मराठी छान आहे आणि मी वयोवृद्ध (सभ्य मराठी भाषेत 'म्हातारडे' या शब्दाला 'वयोवृद्ध' असा गोंडस प्रतिशब्द आहे...) लोकांचा मान वगेरे राखतो हे महत्वाचे गुण त्या काका-काकूंपर्यंत पोचले होते. आता मला इंग्लिश बोलता येतं आणि माझं कंपनीतलं डेसीग्नेशन छान आहे वगैरे माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. मी शांतपणे खिशातून मोबाईल काढला आणि माझ्या हाताखालच्या माणसाशी बोलायचं नाटक केलं... अर्थात अस्खलित इंग्लिशमधून.... - मिनिटं बोलून मी फोन ठेवला (म्हणजे तसं नाटक केलं.) पण काका काकूंकडून काही रीऍक्शन येईना. दोघं शांतपणे सोनोग्राफीच्या केबीनमध्ये गेले.

"भारी इंग्लिश बोलतोस कि रे... लग्न झालंय का रे तुझं? न्हाई.. माजी सक्की भाच्ची लग्नाची हाये. चांगली १२वी पास आहे. दुसऱ्या वेळेत झाली पास. हुशार आहे. संसार चांगला करंल", आज्जी वदल्या!!! काका काकूंच्या मुलीऐवजी ह्या बारावी पास (ते ही २ दा बसून...) चं स्थळ!!! मला सिंहगड चढून जाऊन वरून धपाक्क करून उडी टाकायची इच्छा झाली...

चक्कर येते का म्हणून विचारणारा वॉर्डबॉय, शू केली का म्हणून विचारणारी नर्स आणि या आज्जींच्या १२ वी पास भाचीचं स्थळ.... अहाहा काय दिवस होता... मला आता 'राम' म्हणायची इच्छा होत होती. असो. सुदैवाने काका काकूंचं चेकप लवकर झालं आणि माझी सोनोग्राफी झाली. त्या आज्जींची सोनोग्राफी होऊन त्या बाहेर येईपर्यंत मी धूम ठोकून पार पळून गेलो होतो.

आता कळालं... सोनोग्राफी म्हटलं कि माझ्या पोटात गोळा का येतो ते.....???

असो.... जाता जाता सहज आठवलं म्हणून सांगतो.... तो दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला अतिशय वाईट दिवस असण्याचं आणखी एक कारण म्हणजे दिवसांनी सोनोग्राफीचे रिपोर्ट आले. तिथल्या वॉर्डबॉईजनी छान घोळ घातला होता... कारण 'पेशंट नॉर्मल आहे’ या वाक्यावर थांबता पेशंट महिने गरोदर असून बाळाची वाढ आणि प्रकृती उत्तम आहे अशी 'गोड बातमी' द्यायला डॉक्टर विसरला नव्हता!!!

No comments: